पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
‘पर्वती पायथा येथील महिला मंडळात हे कलादालन असून, येथे २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे,’ अशी माहिती ट्राईब छत्रीचे संस्थापक श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांनी दिली.
या प्रदर्शनात आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थानसह महाराष्ट्रातील मेळघाटातील कोरकू छत्तीसगड येथील माडिया आदिवासींनी बांबू, पाम वृक्षाची पाने यापासून बनवलेले आकाशकंदील, सिरॅमिकच्या रोली कँडल्स, लेदर लॅम्प शेड, हँगिंग लॅम्प, टेबल टॉप लॅम्प, रॉट आयर्न प्रकारातील लामणदिवे असे अनेक प्रकारचे आकर्षक दिवे आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.